पोलीस

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुणे पोलिस मुख्यालयातील चार महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण

महाराष्ट्र खाकी ( पुणे ) – महाराष्ट्र पोलीस दल बिनतारी विभाग, पुणे येथील मुख्यालयातील चार महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.राज्याचे पोलीस दल नेहमी तत्पर, कार्यक्षम, अचूक निर्णयक्षम म्हणून सर्वत्र परिचित आहेत. त्यामुळे राज्याच्या पोलीस दलाप्रती देशातील सर्वांना नेहमी आदर वाटतो, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकल्पांच्या उद्घटनाप्रसंगी काढले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्य बिनतारी संदेश विभागात प्रशिक्षणार्थी क्षमता वाढीबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना देत त्याचा पाठपुरावा करुन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पोलीस कल्याण निधीच्या माध्यमातून पोलिस दलाला सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर असल्याचे सांगितले. महाराष्ट्र पोलीस दलाकरीता उभारण्यात आलेल्या ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इनोव्हेशन सेंटर’ याचे उद्घाटन गृहमंत्र्यांच्या हस्ते झाले. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 10 सुसज्ज डेटा सेंटर युक्त प्रयोगशाळा असलेले हे राज्यातील एकमेव इनोव्हेशन सेंटर आहे. राज्य पोलीस बिनतारी विभागातील कार्यरत मनुष्यबळासाठी प्रशिक्षण व दैनंदिन उपयोगासाठी भव्य कवायत मैदान आणि क्रिडांगणाचेही लोकार्पण गृहमंत्र्यांच्या हस्ते झाले. या क्रिडांगणाभोवती तीन स्टेडियम गॅलरी असून तिथे हजार व्यक्तींची आसन क्षमता आहे.

राज्य बिनतारी मुख्यालयाच्या ज्ञानेश्वरी व संचार या शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणीद्वारे एकूण 112.84 किलोवॅट क्षमतेनुसार प्रतिवर्षी 1,57,976 युनिट विद्युत निर्मिती करणार्‍या प्रकल्पाचेही उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे वर्षाला 15 लाखांची वीज बिल बचत होणार आहे.महत्त्वाच्या अशा पर्जन्यजल पुनर्भरण (Rain Water Harvesting) प्रकल्पाचेही उद्घाटन व लोकार्पण गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यालयाच्या 45 एकर क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवण्यासाठी 1000 चौ.मी. क्षेत्रफळाचे तळे बांधले असून त्याची साठवण क्षमता 25 लक्ष लीटर एवढी आहे.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुंबई शहर पोलीस बिनतारी संदेश विभाग व पोलीस बिनतारी संदेश मुख्यालय पुणे कार्यालयाकरीता आयएसओ प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

Most Popular

To Top