लातूर जिल्हा

शेतकऱ्यांनी BBF या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीनची पेरणी करावी – राज्यमंत्री संजयजी बनसोडे

महाराष्ट्र खाकी ( उदगीर ) – उदगीर तालुक्यासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. या पिकाचे चांगले उत्पादन घेऊन आर्थिक उन्नती साधण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रुंद वरंबा सरी पद्धत ( BBF) या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन ची पेरणी करावी, असे आवाहन संसदीय कार्य, पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम व रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर तालुक्यातील वाढवणा बुद्रुक येथील शेतकरी गोविंद पांडुरंग तरवडे यांच्या शेतावर कृषी विभागामार्फत आयोजित BBF द्वारे सोयाबीनची पेरणी प्रात्यक्षिक प्रसंगी राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. यावेळी कल्याण पाटील, श्याम डावले, दत्ता बामने, नागेश धोंटे, पंचायत समिती सदस्य माधव कांबळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.


राज्यमंत्री संजय बनसोडे पुढे म्हणाले की, कृषी विभागाच्या माहितीनुसार उदगीर तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झालेले आहे. उदगीर तालुक्यातील मुख्य पीक हे सोयाबीन असून या पिकाचे चांगले उत्पादन झाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लागेल. तरी सोयाबीन पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर करावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी शेती पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी वापर करणे ही काळाची गरज असून कृषी विभागाने प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
वाढवणा बुद्रुक येथील शेतकरी गोविंद पांडुरंग तरवडे यांच्या शेतामध्ये रुंद वरंबा सरी पद्धत या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन पिकाचे पेरणी प्रत्यक्ष कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आले होते. हे प्रात्यक्षिक राज्यमंत्री बनसोडे यांनी स्वतः पेरणी करून केले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Most Popular

To Top