पोलीस

कोल्हापूर गोकुळ दूध संस्थेची निवडणूक मतमोजणी केंद्रामध्ये फक्त उमेदवार प्रतिनिधींनाच प्रवेश – पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे

महाराष्ट्र खाकी ( कोल्हापूर ) – गोकुळ दूध संस्थेची मतमोजणी बहुउद्देशीय हॉल, रमणमळा येथे दिनांक 4 मे रोजी होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेकरीता मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधी फक्त यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अन्य कोणालाही मतमोजणी केंद्रात व मतमोजणी परिसरात येण्यास मज्जाव करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कळविले आहे.
कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण राज्यात दिनांक 29 एप्रिल पासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात आपत्ती निवारण कायद्यातंर्गत जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत त्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर कोणीही व्यक्तीस येता येणार नाही. मतमोजणी परिसरात मतमोजणी प्रक्रिया ऐकण्याकरीता थांबता येणार नाही. उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांच्याव्यतिरिक्त इतर कोणालाही मतमोजणी केंद्राच्या परिसरात, आसपासच्या परिसरात थांबता येणार नाही, जमाव करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तिंवर आपत्ती निवारण कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी वगळता अन्य कोणालाही लॉकडाऊनमध्ये विनाकारण शहरामध्ये प्रवेशबंदी असेल. नागरिकांनी सोशल मिडिया, हॉट्सअप ग्रुप व स्थानिक न्युज चॅनेल यांच्या मार्फत मतमोजणीचे निकाल घरबसल्या ऐकावेत. निकालानंतर कुठल्याही प्रकारची रॅली/ मिरवणूक काढण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तिंवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमिवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करु नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही पोलीस अधीक्षक श्री. बलकवडे यांनी केले आहे.

Most Popular

To Top